मुंबई : प्रतिनिधी
राज्यात पावसाची संततधार सुरु आहे. कर्नाटकात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील पालघर, ठाणे, नवीमुंबई, मुंबई, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक येथे येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा (maharashtra) आणि कोकण प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून आजही दिवसभर कोकणात पाऊस असणार आहे. यामध्ये विषेशत: उत्तर कोकणात पावसाचा प्रभाव अधिक असणार आहे.
तसेच उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यात कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव दिसणार आहे. पावसामुळे याभागात काही ठिकाणी मुसळधार अनेक ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.