पुणे : प्रतिनिधी
हडपसर येथील उड्डाणपूल वाहतुकीस धोकादायक झाला आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी पुण्याहून होणारी वाहतूक पुढील वीस दिवस, तसेच सोलापूर आणि सासवडहून होणारी वाहतूक दोन महिने बंद राहणार आहे. या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आमदार चेतन तुपे यांनी बोलवली होती. या बैठकीत हा पूल काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हडपासरच्या उड्डाणपुलावरून प्रवास करताना पुलाला हादरे बसत आहे, अशी तक्रार वाहनाचालकांनी केली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने या पुलाची पाहणी केली. पाहणीदरम्यान पुलाच्या बेअरिंगची झीज आणि मंत्री मार्केट समोरील पीलर-१७ ला तडा गेल्याचे उघडकीस आले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या पुलावरील वाहतूक तात्काळ बंद केली आहे.
दुरुस्तीचे काम होईपर्यंत या पुलाच्या तीनही बाजूची वाहतूक बंद ठेवून ही वाहतूक पुलाखालून वळवली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील जड वाहनांना रात्री दहानंतर ते सकाळी सहापर्यंत या मार्गावरून प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर गाडीतळ येथील चक्राकार मार्गासह पुण्याच्या परिसरातील सर्व बंद असलेली आणि पोलिसांनी जप्त केलेली वाहने माळवाडी येथे हलवण्यात येणार आहे.
गाडीतळ येथील कालव्यावरील बस थांबा हटवला जाणार आहे. तो पुढे गांधी चौकाजवळ करण्यात येणार आहे. याच कालव्यावरील रस्ते कच्चे, डीपी रस्ते वाहतूक योग्य करून त्यावर वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. पुलाखालील पथारी व्यवसाय हटवून तेथून वाहतूक होईल. त्याचबरोबर मुख्य मार्गावरील रिक्षांचे थांबे बंद होणार आहेत. पीएमपीएलचे कर्मचारी वाहतूक नियंत्रणासाठी मदत करणार आहेत, अशी माहिती या बैठकीत दिली.