
पुरंदर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून दुधाला भाव मिळत नाही अशी ओरड आहे. त्याचवेळी पशु आहाराची किंमत झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीला डावलून पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथील एक तरुण शेतकरी निखिल निगडे यांनी दुध व्यवसाय करत असताना कमी खर्चात मुक्तसंचार गोठ्याचा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमातून त्यांना चागंल्या प्रकारचे उत्पन्न मिळू लागले आहे.
आपल्या भारत देशात सर्वाधिक महत्व शेती व्यवसायाला दिले जाते. शेतकरी प्रत्येक गरज पुर्ण करण्यासाठी दिवसरात्र एकत्र करून शेतात घाम गाळताना पाहिला मिळतो. मात्र शेती परवडत नसल्याने प्रपंचाला हातभार लावण्यासाठी शेतीबरोबर दुध व्यावसाय केला जातो. मागील काही दिवसांपासून दुध व्यवसाय करत असताना शेतकर्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या व्यवसायातून काढता पाय घेत आहेत. मात्र याही परिस्थितीत कर्नलवाडीतील निखिल निगडे यांनी मुक्तसंचार गोठ्याची निर्मिती केली आहे.
मी जेव्हा ही कल्पना मनात आणली तेव्हा माझ्याकडे फक्त सहा गायी होत्या. मात्र त्याला लागणारे मनुष्यबळ खूप कमी होते. त्यामुळे दररोजच खूप वेळ खर्च होत होता. त्यांना दिवसातून तीन ते चार वेळा पाणी देणे, सतत स्वच्छ्ता करणे आणि वेळेवर खायला टाकणे यासाठी कामगारांची कमी भासत होती. म्हणून आम्ही मुक्तसंचार गोठ्याच्या विचार केल्याचे निखिल निगडे सांगतात.
आज आमच्याकडे एकून ४० गायी आहेत आणि याचा संपूर्ण देखभाल फक्त तीन व्यक्ती आरामात करत आहेत. सहा गायींच्या देखभालीसाठी जो खर्च व्हायचा तेवढ्याच खर्चात आपण १०० गायीच्या गोठ्याचे व्यवस्थापन करू शकतो. त्यामुळे आता दूध व्यवसाय खूप फायदेशीर ठरला आहे. त्यातून आम्हाला चांगला नफा मिळत असल्याचेही निखिल निगडे यांनी सांगितले.
कोणतीही गोष्ट मनापासून केली तर त्यात यश प्रप्त झाल्याशिवाय राहणार नाही. याचे उदाहरण निगडे यांनी स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर सर्वांसमोर ठेवले आहे.