
पुणे : प्रतिनिधी
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे निधन झाले. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. कालच त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली होती.
गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर उपचार सुरु होते. न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या उपचारादरम्यान आज पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार
बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव सकाळी ८ वाजता त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेले जाणार आहे. त्यानंतर १० ते १०-३० वाजण्याच्या दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, अशीही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, काल संध्याकाळी पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. त्यातच सोशल मिडीयात त्यांच्या निधनाच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या.