मुंबई : प्रतिनिधी
ईडीकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. अशातच आता राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने ईडी कार्यालयात जाऊन अनेक बाबींचा जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे. ईडीने अनेक भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल केले, मात्र त्या गुन्ह्याबाबत पुढे काय झाले..? या महत्वपूर्ण विषयाचा जाब विचारला जाणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
अल्पसंख्यांक विभागाशी संबंधित गैरव्यवहारासंदर्भात ईडीने आज पुणे आणि औरंगाबादमध्ये छापेमारी केली. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ ईडी कार्यालयात जाऊन अनेक बाबींचा जाब विचारणार असल्याची माहिती दिली.
यावेळी बोलताना नवाब मलिक म्हणाले, भाजपच्या अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केली होती. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्यावरील कारवाई थांबवण्यात आली. या सर्व प्रकरणाची माहिती राष्ट्रवादीकडून गोळा करण्यात आली आहे. अशा प्रकरणांची संपूर्ण यादी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मंत्री, नेते ईडीच्या कार्यालयात जाऊन देणार आहेत.
ईडीकडून भाजप नेत्यांवरील कारवाईला गती का दिली जात नाही..? भाजपमधील नेत्यांशी संबंधित प्रकरणांचे तपास का थांबले आहेत? याची माहिती या शिष्टमंडळाकडून घेतली जाईल. ईडीला सहकार्य करण्यासाठी सगळी माहिती गोळा झाली आहे. ज्या भाजप नेत्यांबाबत तक्रारी दाखल आहेत, त्याचा तपास गतीमान करावा, अशी विनंतीही केली जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.