Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : राज्य सरकारकडून प्राथमिक शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील; १ डिसेंबर पासून चालू होणार पहिली ते चौथीचे वर्ग

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

प्राथमिक शाळा सुरू कधी होणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. टास्क फोर्सकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर राज्य सरकारने प्राथमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १ डिसेंबरपासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज मुंबईत पार पडली. मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनीही या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. येत्या १ डिसेंबरपासून राज्यातील सर्व प्राथमिक शाळात पहिली ते चौथीचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पहिली ते चौथीच्या वर्गातील मुले लहान आहेत. त्यामुळे मागील वेळी बरीच खबरदारी घेण्यात आली. मात्र सर्वच मुलांसाठी शाळेत जाणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भात टास्क फोर्ससोबत चर्चा करून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणमंत्री डॉ. वर्षा गायकवाड यांनी दिली.

वर्षाताई गायकवाड म्हणाल्या , कोरोनाचे सर्व नियम पाळत शाळा चालू करण्यास काही हरकत नाही, असे टास्क फोर्सचे म्हणणे आहे. मतीमंद  मुलांच्याही शाळा सर्व नियम पाळून चालू करण्यात येणार आहे. त्यासोबतच निवास  शाळांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. विद्यार्थी पुन्हा शालेय जीवनात यावे, याकरिता पहिली ते चौथी चे वर्ग चालू करण्याचा राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आला असल्याचे  वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version