मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणेकडून कसून चौकशी चालू आहे. आता कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि बांधकाममंत्री अशोक चव्हाण हे दोघेही केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगरमधील एका मोठ्या मंत्र्याचा पुराव्यासहित भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे म्हटले होते. तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नांदेडमधील एक मोठा नेता तपास यंत्रणेच्या जाळ्यात अडकणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि नांदेडमधील बांधकाम मंत्री अशोक चव्हाण केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ परिवहन मंत्री परब, खासदार आनंदराव अडसूळ, खासदार भावना गवळी अशा महत्त्वांच्या नेत्यांची चौकशी चालू आहे.
काही दिवसापूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे दोन बड्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. त्यांचा रोख बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याकडे होता असे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे काँग्रेसचे किती नेते केंद्रीय तपास यंत्रणेच्या जाळ्यात अडकतील याकडे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, देगलूर विधानसभा निवडणुक तोंडावर आली असताना विरोधकांकडून खळबळ माजवण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. भारतीय जनता पार्टीकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा चुकीच्या पद्धतीने गैरवापर चालू आहे, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे.