
पुणे : प्रतिनिधी
गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास येरवडा येथील शास्त्रीनगर भागात इमारतीचा स्लॅब कोसळून पाच मजुरांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक तथ्य शोध समिती स्थापन करण्यात आली आहे.
बांधकामाचे नियम न पाळता काम चालू असल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. त्यासाठी पोलिसांनी मजुरांच्या व मृत्यूस व मजुरांना गंभीर जखमी करण्यासाठी ब्लू ग्रास बिझनेस पार्क कंपनी व अहलुवालिया कन्स्ट्रक्शन या कंपनींना कारणीभूत धरत सदोष मनुष्यवधासह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाणार असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक तथ्य शोध समिती गठित करण्यात आली आहे. या समितीकडून या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल. यामध्ये बांधकामाशी संबंधित बारकावे अन्य बाबी तपासून पुढील कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, शास्त्रीनगर भागात बांधकामावर असलेल्या आठ मजुरांवर स्लॅबची जाळी कोसळली. या घटनेत पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन मजूर गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले होते. जखमी झालेल्या तीन मजुरांवर ससून रुग्णालयात उपचार चालू आहेत. दुर्घटनेत पीडित बिहारमधील आहेत.