
मुंबई : प्रतिनिधी
शिवजयंती साजरी करण्यासाठी गृह विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या प्रस्तावाला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता मिळाली आहे. यंदाच्या वर्षी शिव ज्योतीसाठी २०० जणांना, तर जन्मोत्सव सोहळ्यासाठी ५०० जणांच्या उपस्थितीला परवानगी असणार आहे.
येत्या शनिवारी म्हणजे १९ फेब्रुवारीला शिवजयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत परवानगी देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता मान्य केला आहे.
कोरोनाचे सर्व नियम पाळून शिवजयंतीचा सोहळा साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसे आदेश गृह विभागासह यंत्रणांना देण्यात आले आहे. शिवजयंतीच्या सोहळ्यासाठी विविध प्रेरणास्थळावरून शिवज्योती वाहून आणल्या जातात. त्यासाठी २०० जणांना सहभागी होता येणार आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्यात ५०० जणांना उपस्थित राहता येणार आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात कोणताही सण आणि उत्सव नेहमीसारखे साजरा करता आला नाही. या काळातील प्रत्येक सण, उत्सव आणि जयंतीवर काही ना काही निर्बंध राहिले आहेत. कोरोनाचे सावट थोड्या प्रमाणात कमी झाले आहेत. त्यामुळे यंदा तरी शिवजयंतीसाठी निर्बंध शिथिल असावेत अशी मागणी करण्यात आली होती.
लोकांच्या मागणीचा विचार लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाची शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात पार पडणार असल्यामुळे शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.