मुंबई : प्रतिनिधी
गैरप्रकारामुळे म्हाडाच्या भरती परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत होता. त्यामुळे राज्य सरकारने संबंधित कंपनीचे कंत्राट रद्द करुन या परीक्षा टीसीएस (TCS) या संस्थेमार्फत घेण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. म्हाडाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी सरकारने टीसीएस या नव्या संस्थेकडे परीक्षांची जबाबदारी दिली आहे.
जे विद्यार्थी कोणालातरी हाताखाली धरून इतरांच्या जागा हिसकावून घेत असतील. तर ते थांबवणे आमचे कर्तव्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नोकरी मिळण्याच्या इच्छेपोटी दलालांना पैसे दिले आहेत. त्या विद्यार्थ्यांची काहीच चूक नाही. त्या विद्यार्थ्यांना आम्ही गुन्हेगार ठरवणार नाहीत. मात्र त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला दलालांची नावे कळवावीत. त्यांना धडा शिकवण्याची आमची जबाबदारी आहे असे सांगतानाच परीक्षेत पारदर्शकता आणि प्रामाणिक, हुशार, गरीब घरांतून आलेल्या मुलांचे हक्क डावलले जाऊ नये, हाच उद्देश असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतानाच राज्य सरकारवर पुन्हा म्हाडाच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार उघडकीस आल्यावर ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने म्हाडाच्या परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आणला असून परीक्षा घेणाऱ्या संबंधित कंपनीच्या सहा संचालकांना अटक करण्यात आली आहे.