मुंबई : प्रतिनिधी
केंद्राच्या कृषी कायद्याला कडाडून विरोध होत असतानाच आता महाराष्ट्रात या कायद्यात बदल करुन त्याची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आज नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यासह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत कृषी कायद्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
मेधा पाटकर, राजू शेट्टी यांच्यासह विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी मुंबईत आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत कृषी कायद्यासंदर्भात चर्चा केली. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात या शिष्टमंडळाने भूमिका मांडली. राज्य सरकारने या संदर्भात ठोस भूमिका घेवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकरी संघटनांच्या मागण्या आणि कृषी कायद्यासंदर्भातील भुमिकेबाबत लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे. दरम्यान, या बैठकीसंदर्भात बोलताना राजू शेट्टी म्हणाले, येत्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्याचा ठराव मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे हे दाखवून देण्यासाठी या कायद्यासंदर्भात योग्य निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी केली आहे.