मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेच्या दुखण्याचा त्रास असल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आठवड्याभरापुर्वी शस्त्रक्रिया झाली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु सध्या मुख्यमंत्र्यांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे सध्या तरी त्यांना रुग्णालयातच थांबावे लागणार आहे. त्याच्या प्रकृतीविषयी शिवसेना नेते संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.
आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. ‘माझं रात्रीच त्यांच्याशी बोलणं झालं. ते लवकरच बरे होऊन घरी जातील’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. मानेच्या दुखण्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असुन त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज मिळेल असं म्हटलं जात होतं. मात्र अद्याप ते रुग्णालयातच आहेत.
राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, संप मिटवण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे रात्रंदिवस चर्चा, बैठका घेतायत. मात्र काही संघटना आणि राजकीय पक्षांच्या भूमिकेमुळे यात अडथळा येत आहे.