पुणे : प्रतिनिधी
मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुणे आणि मुंबई शहरातही मोठ्या प्रमाणात कोरोना आणि ओमीक्रॉनचे रुग्ण आढळत आहेत. मागील आठवड्यात अनेक नेत्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यातच आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
पुणे आणि मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मागील आठवड्यात खासदार सुप्रिया सुळे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदींसह अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच आज महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
रुपाली चाकणकर यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत माहिती देताना केलेल्या ट्विटमध्ये रुपाली चाकणकर म्हणतात,‘सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन.’