Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : महाविकास आघाडी सरकारचा ‘मास्टर प्लॅन’; फडणवीसांच्या काळातील घोटाळे बाहेर निघणार..?

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

 गेल्या काही दिवसापासून किरीट सोमय्या यांच्यासह काही भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत. या आरोपांची महाविकास आघाडी सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने भाजपला जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने फडणवीसांच्या काळात झालेले घोटाळे बाहेर काढले जाणार आहेत. त्यासाठी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.  ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मला मुख्यमंत्री व  उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची असल्याचे सांगितले. त्यांनी या  बैठकीस हजर असलेल्या अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितले. या बैठकीत फडणवीस सरकारच्या काळात झालेले घोटाळे बाहेर काढण्यासाठी प्रदीर्घ चर्चा झाली असल्याचे समजते. या बैठकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मंत्री जास्त आक्रमक झाल्याचे समजते.  भाजपला महाविकास आघाडीचे सरकार पडत नसल्यामुळे आरोपांच्या माध्यमातून सरकारची प्रतिमा मलीन करण्याचे काम केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

फडणवीस सरकारच्या काळात मोठा आर्थिक फायदा झालेले अनेक अधिकारी आहेत. हे अधिकारी महाविकास आघाडी सरकार विरोधात  माहिती पुरवत असल्याची चर्चाही यावेळी झाली असल्याचे समजते.  त्यामुळे या सर्व प्रकरणांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील मंत्र्यांनी आग्रह धरला आहे. यासाठी या बैठकीत  व्यूहरचना आखण्यात आली असून त्याची जबाबदारी सरकारमधील तीनही पक्षातील बड्या मंत्र्यांकडे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version