
मुंबई : प्रतिनिधी
आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेसकडून राज्यात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात मोठे बदल करून काही मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
विशेष म्हणजे, या बदलांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडही याच अधिवेशनात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. ही भेट मंत्रीमंडळातील फेरबदलांसाठी होती का याबद्दल नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितलेले नाही. मात्र पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल. काही मंत्र्यांना दिल्लीत बोलावून त्यांच्या सोबत पक्षश्रेष्ठी चर्चा करत आहेत. सर्व बाजूंनी चर्चा झाल्यानंतर काहींना पक्षकार्यात सामावून घेतले जाईल, तर काहींना मंत्रिपद देण्याबाबत विचार केला जाईल, असेही पटोले यांनी म्हटले आहे.
काही महिन्यांपूर्वी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्षपद आणि मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार मंत्रीमंडळ फेरबदलांमध्ये नाना पटोले यांचे मंत्रीपद निश्चित मानले जात आहे.
कोरोना काळामध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या विभागाबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे वर्षा गायकवाड यांचे मंत्रीपद काढून घेतले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडील जबाबदाऱ्यांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. तर विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार संग्राम थोपटे यांची वर्णी लागू शकते, असे जाणकारांकडून सांगण्यात आले.