नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. काही नियमांच्या अधीन राहून बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे बैलगाडा मालकांना आणि शर्यत प्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात आता तब्बल ७ वर्षांनंतर बैलगाडा शर्यतींचा धुराळा उडणार आहे.
उच्च न्यायालयाकडून चार वर्षांपूर्वी बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली होती. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे. ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात राज्य सरकारकडून बाजू मांडली. बैलगाडा शर्यतीचे आयोजन करताना आयोजकांकडून सर्व नियमांचे पालन करण्यात यायला हवं. पशु क्रूरता प्रतिबंधात्मक कायद्याचे सर्व नियम पाळत बैलगाडा शर्यती व्हायला हव्यात, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्या, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. बैलगाडा शर्यतींवर बंदी घातल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होता. बैलगाडा शर्यती पुन्हा हाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. अखेर न्यायालयाने शर्यतीसाठी परवानगी दिली. या निर्णयामुळे निश्चितच सर्वांना आनंद झाला आहे. एकदा न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सर्व नियमांचे पालन करीत बैलगाडा शर्यत आयोजन करण्याचे आवाहन दिलीप वळसे-पाटील यांनी केले आहे.