
मुंबई : प्रतिनिधी
नगरविकास मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनकडून जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले आहे. तुम्ही पालकमंत्री झाल्यापासून विकासाची कामे चालू केली आहेत. तुम्ही चालू केलेल्या विकास कामामुळे आम्हाला मिळणाऱ्या पैशांचा ओघ थांबला आहे. त्यामुळे जिल्ह्यात चालू केलेली विकासकामे थांबवा, अन्यथा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना उडवून देऊ अशा धमकीचे पत्र एकनाथ शिंदे यांच्या घरी मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जेव्हापासून तुम्ही पालकमंत्री झाला आहात तेव्हापासून आमचे अनेक साथीदार शहीद झाले आहेत. आमचे साथीदार केवळ गडचिरोली जिल्ह्यातच नाहीत. सर्व शहरांमध्ये आमचे साथीदार आहेत. तुमच्या आसपासही आमचे साथीदार फिरतात हे तुम्हाला माहिती नसावे. तुमच्याकडून नक्षलवाद संपवण्याची वेळोवेळी भाषा होत आहे. नक्षलवाद संपवणे हे शक्य नाही. त्यामुळे नक्षलवाद संपवण्याची भाषा तुम्ही करू नये. आम्ही इतर सर्व राज्यात आहोत. तुम्हीच नाही तर आम्हाला कोणीच संपवू शकत नाही, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. मी जेव्हापासून गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री झालो आहे, तेव्हापासून अशा अनेक धमक्या आलेल्या आहेत. त्यामुळे मी असल्या कुठल्याही धमक्यांना घाबरत नाही. गडचिरोली जिल्ह्याचा विकास करणे हा माझा ध्यास आहे. नक्षलवादी भागातील मागासलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणायचे आहे. या विकासकामांमध्ये कोणीच आडवे येऊ शकत नाही. लवकरच गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.