
मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकार हे १७० आमदारांच्या पाठिंब्यावर स्थापन झालेले आहे. त्यामुळे आमच्या आमदारांबद्दल आत्मविश्वास नाही हा विरोधकांचा पोकळ दावा आहे. विरोधकांना इतकंच वाटत असेल तर त्यांना सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याचा अधिकार आहे. तो त्यांनी मंजूर करून दाखवावा आणि आम्हीही तो नामंजूर करून दाखवू असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
बुधवारपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आज सायंकाळी चहापान कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.
केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना आरोप करण्याशिवाय काहीही येत नाही. आज तर त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट कधी लावायची एवढंच चालल्याचं वक्तव्य केलं. एखाद्या महत्वाच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष असं बोलत असतील तर धन्य आहे. त्यांच्यावर काही बोललेलंच बरं असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या व्यक्तव्याला प्रत्युत्तर दिले.
विरोधकांकडून महाविकास आघाडीला आत्मविश्वास नसल्याचा आरोप केला जातो. त्यावर बोलताना अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. १७० आमदारांच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडही निर्विवादपणे होईल. मात्र विरोधकांना एवढीच शंका असेल तर त्यांना सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याचा अधिकार आहे. त्यांनी तो मंजूर करून दाखवावा आणि आम्ही तो फेटाळून लावूनच दाखवू असा इशाराच अजितदादांनी थेट दिला.