मुंबई : प्रतिनिधी
क्रुझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीच्या ताब्यात असलेल्या अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अखेर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.आर्यन खान सोबतच मूनमून धमेचा आणि अरबाज मर्जंट यांनाही न्यायालयाकडून जमीन मंजूर करण्यात आला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून न्यायालयात आर्यन खानसोबत अन्य आरोपींच्या जामीन याचिकेवर सुनावणी चालू होती. अखेर त्यांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या २५ दिवसांपासून तिघेही एनसीबीच्या ताब्यात होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन साप्रे यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. एनसीबीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. तर आर्यनच्या वतीने विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आर्यन खान व अन्य आरोपींना विशेष अटी घालत जमीन मंजूर केला आहे.
याबाबतची संपूर्ण आदेशाची प्रत उद्या (शुक्रवारी) मिळणार आहे. उद्या किंवा शनिवारी आर्यन खानची पोलीस कोठडीतून सुटका होणार असल्याची माहिती आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी दिली आहे. ३ ऑक्टोबरला आर्यन खान व अन्य आरोपींना एनसीबीने अटक केली होती.
क्रुझवरील पार्टीमध्ये आठजणांकडे अमली पदार्थ सापडले आहेत. तसेच यासंबंधीची व्हॉट्स ॲप चॅटिंग मिळाली आहे. तसेच काही आरोपींकडे व्यापारी प्रमाणातील अमली पदार्थ सापडले आहेत. एनडीपीएस प्रकरणामध्ये जामीन देता येत नाही, असा युक्तीवाद अनिल सिंग यांनी केला.
एनसीबीकडून अटकेची योग्य कारणे न देताच अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन झाले आहे असा युक्तिवाद आर्यन खानचे वकील विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी केला. यावर न्यायालयाने विशेष अटी घालत आर्यन खान आणि अन्य आरोपींना जामीन मंजूर केला आहे.