मुंबई : प्रतिनिधी
विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीचा मंत्रीमंडळाने पाठवलेला प्रस्ताव राज्यपालांच्या मंजूरीअभावी पडून आहे. या विषयावरून राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये संघर्ष सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवळ १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात राज्यपालांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचे बोलले जात असून या भेटीकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आज राज्यपालांची भेट घेतील अशी शक्यता राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी वर्तवली आहे. या भेटीमध्ये मुख्यत्वे १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत चर्चा होण्याची शक्यता असल्याचेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
मध्यंतरी लोकायुक्तांच्या शपथविधीदरम्यान राज्यपालांनी १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर पुण्यात कॉँग्रेस नेत्यांकडून १२ आमदारांची नियुक्ती करण्याबाबत विनंती झाल्यानंतर राज्यपालांनी सरकारने आग्रह धरला पाहिजे अशी भूमिका मांडली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांनी या संदर्भात भेटीसाठी बोलवल्याची माहिती दिली होती. ही बहुप्रतीक्षित भेट आज होण्याची शक्यता असून या भेटीत काय निर्णय होतोय याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.