मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या नक्षलवादाच्या विषयावरील बैठकीसाठी ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत .शरद पवार यांची भेट घेऊन ते दिल्लीला रवाना झाले आहेत . आज सकाळी दहा वाजता ही बैठक होणार आहे. देशातील नक्षलवाद आणि माओवाद या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे.
दोन दिवसापूर्वी ठाकरे यांना या बैठकीचे आमंत्रण मिळाले होते. त्यानुसार ते आज दिल्लीला रवाना झाले आहेत. अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील गडचिरोली , चंद्रपूर आणि छत्तीसगड सीमा या भागातील नक्षलवादाच्या मुद्यावर ठाकरे चर्चा करणार आहेत. देशातील मोठ्या शहरातही नक्षलवाद उद्भवण्याची शक्यता असल्याचे काही दिवसापूर्वी गुप्तचर विभागाकडून कळविण्यात आले आहे. अशा अनेक विषयावर या बैठकीत चर्चा करण्यासाठी केंद्राकडून राज्यांना कळविण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघाले आहे. ठाकरे यांनी केलेले ‘ भावी सहकारी असू’ या विधानाने राज्यातील राजकीय वर्तुळात उधाण आले होते. त्यानंतर ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. मागच्या दौऱ्यासारखी या वेळीही बैठकीनंतर शहा-ठाकरे यांची खासगी बैठक होईल का? जरी झाली तर काय चर्चा होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.