Site icon Aapli Baramati News

मी बोललो, तर विरोधकांची प्रकृती बिघडेल : संजय राऊत यांचा टोला

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला आपण फार गांभीर्याने घेत नाही. मी जर बोलायला सुरुवात केली, तर चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच विरोधकांची प्रकृती बिघडेल, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेतला आहे.

दिल्लीत सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे सध्या दिल्लीत आहेत. सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांना आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले. चंद्रकांत पाटील यांनी काल फलटणमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली होती. भाजपच्या जीवावर १८ खासदार निवडून आणणाऱ्यांनी देशाच्या राजकारणात जायची स्वप्ने पाहू नयेत असे त्यांनी म्हटले होते. तसेच शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात असेही वक्तव्य त्यांनी केले होते.

चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेबद्दल विचारल्यानंतर संजय राऊत यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये या व्यक्तव्याचा समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांना इतकं गांभीर्याने का घेताय असा सवाल करून संजय राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील जे बोलतात ते गांभीर्याने घेण्यासारखे नसते. ते सातत्याने नैराश्यातून आणि वैफल्यातून बोलत असतात. त्यांच्या विधानांवर प्रश्न विचारून तुम्हाला त्रास होईल आणि उत्तर ऐकून त्यांनाही त्रास होईल. त्यांची प्रकृती नीट राहावी म्हणून आपण उत्तर देत नाही.

महाराष्ट्रात कोण कुणाला खांद्यावर घेऊन वाढवत होतं हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. मी जर बोलायला सुरुवात केली तर अनेकांची प्रकृती ढासळेल, म्हणून मी उत्तर देत नाही. महाराष्ट्रातल्या जनतेची प्रकृती विशेषत: राज्यातील जनतेची प्रकृती नीट राहायला हवी. कारण विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांसाठी प्रेरणादायी असतो. त्यामुळे मी उत्तर देत नाही आणि जर उत्तर दिलंच तर अनेकांची प्रकृती खालावेल, अशा शब्दांत संजय राऊत यांनी विरोधकांवर प्रहार केला.        


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version