
अहमदनगर : प्रतिनिधी
शहरात दिवसेंदिवस लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आणखी एक थरारक घटना नागापूर परिसरात घडली आहे. कामावरून घरी परतत असताना व्यावसायिकाला डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र व्यावसायिकाच्या प्रतिकारामुळे चोरट्यांनी तिथून पळ काढला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
संदीप पोपट नागरगोजे (वय ३३ वर्षे, रा आदर्शनगर) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही संपूर्ण घटना नागापूर परिसरातील आदर्शनगरमधील गुरुकृपा कॉलनीत घडली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नागरगोजे हे आपल्या घरासमोर गाडी पार्क करत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील पैशांची बग हिसकावण्याच्या प्रयत्न केला. चोरट्यांनी त्यांच्या शेजारी आपली गाडी उभी केली. त्या गाडीतील एका चोराने खाली उतरून त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. नागरगोजे यांनी लगेच त्यांच्या हातातील पैशांची बॅग घराच्या गेटच्या आत फेकली. आणि चोरट्यांना प्रतिकार केला. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला.
या संपुर्ण घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. पाळत ठेवून ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नागरगोजे यांच्या तक्रारीवरून चोरट्यांनी विरोधात दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करत आहेत.