पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरातील कात्रजमध्ये चंद्रभागा चौकात आज भरदिवसा समीर मनुर या काँग्रेस पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. काही तासात या हत्येचा छडा लावण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून एका मित्रानेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे.
आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कात्रजमधील चंद्रभागा चौकात समीर मनुर हा चहा पिण्यासाठी थांबला होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी समीरच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. त्यात समीरचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेत समीरवर तब्बल सहा गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली.
भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवत या घटनेचा उलगडा केला आहे. आर्थिक व्यवहारातून समीरच्या जुन्या मित्रानेच ही हत्या घडवून आणल्याचे समोर आले आहे. हत्या करणारा समीर मनुर याचा जुना मित्र आहे. मेहबूब बनोरगी असे त्याचे नाव असून आर्थिक व्यवहारातून त्याने समीरची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी मेहबूब बनोरगी याला अटक केली असून उर्वरीत दोन आरोपींच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आली आहेत.
समीर मनुर याची नुकतीच काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती. पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत समीर मनुर याच्या आंबेगाव दत्तनगर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले होते.