मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या बहिणींशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने धाड टाकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकल्याचं मला दु:ख नाही. मात्र केवळ माझ्या घरातल्या आहेत म्हणून बहिणींच्या कंपन्यांवर धाड टाकली जात असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत राष्ट्रवादी भवनात अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली याचं मला कोणत्याही प्रकारचे दुःख नाही. परंतु माझ्या बहिणीच्या मालमत्तेवर धाडी टाकण्यात आली आहे. तर केवळ माझे नातलग म्हणून धाडी टाकल्या असतील तर ते योग्य नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण होत असेल तर ते चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मी पण एक नागरिक आहे आणि मला एकच गोष्टीचे दुःख आहे. कोल्हापूर आणि पुण्यातील दोन बहिणींवर धाडी टाकल्या. त्याचं कारण मला माहित नाही. परंतु अजित पवारांची नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल, तर राज्यातील जनतेने याचा जरूर विचार करावा. कोणत्या स्तरावर जाऊन या संस्थेचा वापर केला जातो हेही जनतेने लक्षात घ्यायला हवे, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.