Site icon Aapli Baramati News

माझे विरोधकांशी चांगले संबंध; पण मी निवडणुकीत फिक्सिंग केली नाही : अजितदादांची टोलेबाजी

ह्याचा प्रसार करा

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे काँग्रेससोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही. जर शिवसेना राष्ट्रवादी सोबत युती करून लढण्यास तयार असेल तर राष्ट्रवादीदेखील दोन पावले पुढे सरकेल, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. माझेही विरोधकांशी चांगले संबंध आहेत. पण मी कधीही फिक्सिंग केली नाही, असा जोरदार टोला लगावत अजितदादांनी बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत.

शुक्रवारी पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकाचे बळ चांगले आहे. शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीसोबत येण्याची इच्छा असल्याच्या बातम्या वाचनात आल्या. मित्रपक्ष अशी भूमिका घेत असतील तर, राष्ट्रवादी दोन पावले पुढे सरकेल, अशी आपली मानसिकता आहे. जे राष्ट्रवादीसोबत येण्यास तयार आहेत, त्यांनी पक्षाच्या ताकदीप्रमाणे जागा वाटप करून घ्याव्यात, असे झाल्यास काहीच अडचण नाही. भाजपाला पराभूत करणे हेच आमचे ध्येय आहे, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकासआघाडी अशी चर्चा करत असाल तर तिकीट वाटप कसे करायचे ? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे तर काँग्रेसचा प्रश्न सध्या तरी संपला आहे. त्यांना सोबत यायचे की नाही हा त्यांचा प्रश्न असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version