
पुणे : प्रतिनिधी
राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. स्थापनेपासून विरोधी पक्ष भाजपाकडून राज्य सरकार कोसळण्याचे दावे केले जात आहेत. अशातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अन्न व पुरवठा मंत्री भुजबळ यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. त्यानंतरही पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर सत्तेत येणार आहे. त्यामुळे सरकार कोसळण्याची स्वप्न पाहणाऱ्यांनी निवांत राहावे, असा खोचक टोला लगावला आहे.
आज महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मी मंत्रिपदाची शपथ घेऊन दोन वर्षे पूर्ण केली आहेत. हे काही लोकांना पचत नाही. मंत्रीपद येत राहतात आणि जातात. मात्र जो जनतेसाठी कामे करत असतो, तोच जनतेच्या लक्षात राहत असतो. लोकांना वाटत आहे की, महाविकास आघाडीचे सरकार आज कोसळेल, उद्या कोसळेल. परंतु महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे आणि त्यानंतरही सत्तेत येणार आहे, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारने कोरोनाचे कारण सांगत २०२१ ची जनगणना थांबवली. मात्र राज्यांना ओबीसींचा इम्पेरीकल डाटा गोळा करण्यास सांगत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मी ओबीसी असल्याचे सांगतात. मग इम्पेरीकल डाटा देत का नाहीत ? ते गप्प का बसले आहेत, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
छत्तीसगडच्या सरकारने ओबीसी जनगणना सुरू केली आहे.आपणही राज्यात लवकरच ओबीसींची जनगणना सुरू करणार असल्याचे सांगतानाच छगन भुजबळ यांनी गुजरातचे चार सुपुत्र आहेत. दोन सुपुत्र विकत आहेत, तर दोन सुपुत्र विकत घेत आहेत, अशी घणाघाती टीकाही केली.