मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यास भाग पाडून त्यांना तिकीट देऊन तिथे जाऊन कोरोना पसरवण्यास सांगितले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेत केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडत आहोत. त्यामुळे मी त्यांच्या भाषणाकडे खूप अपेक्षेने पाहत होते. त्यांनी केलेल्या महाराष्ट्रबद्दल वक्तव्याचा मला खूप वेदना झाल्या. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील या वक्तव्यामुळे वाईट वाटले. राज्याने भाजपला १८ खासदार निवडून दिले आहेत. त्यांचा पंतप्रधान असण्यामागे महाराष्ट्रातील मतदारांचा मोलाचा वाटा आहे. त्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा असा अपमान करणे हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे, असे त्या म्हणाल्या.
नरेंद्र मोदी हे भाजपचे नसून देशाचे पंतप्रधान आहे. ते एका पक्षाच्या वतीने बोलताना पाहून मला खूप वाईट दु:ख झाले. इतर राज्यांच्या तुलनेने सगळ्यात जास्त रेल्वे गुजरात राज्यात गेल्या. केंद्र सरकार या रेल्वे चालवते. आम्ही रेल्वे नाही एसटी बस देऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या या भाषणामुळे मला खूप वेदना होत असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.