मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने व राजकीय हेतूने घडतंय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. या संदर्भात आता कायदेशीर मार्गानेच उत्तर दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या विरोधात ईडीमार्फत जी कारवाई करण्यात येत आहे त्यावर नवाब मलिक यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे. ज्यांनी काहीच केलेले नाही असे लोक अशा कारवायांना घाबरणार नाही. ज्यांच्यात हिम्मत नव्हती त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून स्वत:चा बचाव करून घेतला. मात्र आम्ही अशा गोष्टींना घाबरणार नाही असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
ईडीमार्फत नेत्यांना नोटीस देणे, काही ठिकाणी छापेमारी होतेय. त्यांना अधिकार असतील तर त्यांनी करावी परंतु ज्यापध्दतीने भाजपचे लोक मागणी करत आहेत व कारवाई होतेय याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत किती केसेस दाखल केल्या व प्रलंबित आहेत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करायला ईडीला सांगितले होते असेही नवाब मलिक म्हणाले.