मुंबई : प्रतिनिधी
छोट्या पडद्यावरील महाभारत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर बराच काळ अधिराज्य गाजवले. याच मालिकेत भीमाची भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार यांचे निधन झाले आहे. ते ७४ वर्षांचे होते. केवळ अभिनय क्षेत्रातच नव्हे तर त्यांनी क्रीडा क्षेत्रातही कामगिरी केली होती.
हॅमर आणि डिस्क थ्रोमध्ये ते ॲथलिट होते. आशियाई स्पर्धेत त्यांनी २ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्यपदक भारताला मिळवून दिले होते. त्याचबरोबर त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. अर्जुन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. भारतीय सीमा सुरक्षा दलात ते डेप्युटी कमांडंट होते. त्यांची कामगिरी ऐकून बीआर चोप्रा हे त्यांना भेटण्यासाठी गेले आणि तिथूनच त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.
प्रवीण कुमार यांनी ५० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले. ‘महाभारत और बर्बर’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आम आदमी पक्षाच्या तिकिटावरुन वजीरपुरमध्ये निवडणूक लढवली खरी पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
वयाच्या ७२ व्या वर्षापासून ते हलाखीचे जीवन जगत होते. त्यांना मणक्याची समस्या होती, त्यामुळे ते काम करू शकत नसल्याने आर्थिक समस्येचा सामना करावा लागत होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी सरकारकडे मदतीची मागणीही केली होती.