बारामती : प्रतिनिधी
अघोरी पद्धतीने उपचार आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी अटक केलेल्या मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात आणले जाणार असून आता काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संत बाळूमामांचा वशंज असल्याचे सांगत मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याने कर्करोगावर अघोरी इलाज केल्याची फिर्याद शशिकांत खरात यांनी दिली होती. त्यावरून मनोहर भोसले, नाथबाबा उर्फ विशाल वाघमारे आणि ओंकार शिंदे या तिघांवर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी मनोहरमामाला लोणंदनजिकच्या सालपे येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मनोहरमामाला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. या दरम्यान, तालुका पोलिसांनी मनोहरमामाची एक्सयुव्ही कार जप्त केली आहे.
या प्रकरणातील नाथबाबा उर्फ विशाल वाघमारे आणि ओंकार शिंदे हे दोघे अद्यापपर्यंत फरार आहेत. त्यामुळे पोलिसांच्या लेखी या प्रकरणाचा तपास अपूर्णच आहे. परिणामी या प्रकरणातील गुंता आणखीनच वाढत चालला आहे.
आज मनोहरमामा यांची पोलिस कोठडी संपत आहे. त्यांना आज बारामतीतील न्यायालयात हजर केले जाणार आहे. आता या कोठडीत वाढ होणार की न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.