भिगवण : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील भिगवण शहरातील सोनाज पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली असून दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत भिगवण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भिगवण येथील सोनाज पेट्रोलपंपावर ४ ते ५ दरोडेखोर सशस्त्र दरोडा टाकणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानुसार पेट्रोलपंपावर सापळा रचण्यात आला. या सापळ्यात दरोड्याच्या तयारीतील पाच दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे.
संदिप आनंद हीरगुडे (वय ३४ वर्षे, रा.हारनस, ता. भोर), अनिकेत विलास सुकाळे (वय २३ वर्षे, रा. मुळ रा. काबरे ता. भोर) रामदास उर्फ युवराज ज्ञानोबा शेलार (वय ३३ वर्षे, रा. वाकंम्बे ता. भोर) आणि पुनीत (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी अटक केलेल्यांची नांवे आहेत. त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतुस, एक लोखंडी कटावणी, एक चाकु, एक रस्सी, मिरचीची पुड व एक ड्रिम युगा मोटार सायकल असा एकुण १ लाख ५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या आरोपींवर भादंवि कलम ३९९, ४०२, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस, रुपेश कदम, पोलिस अंमलदार इन्कलाब पठाण, समीर करे, आप्पा भंडलकर, रामदास जाधव, सचिन पवार, अंकुश माने, शंकर निंबाळकर, सुभाष गडदे, पोलिस मित्र रवी काळे, विकास गुणवरे, अशोक चोळके यांनी ही कारवाई केली.