नागपूर : प्रतिनिधी
एखादा पक्ष राज्याची वारंवार बदनामी करुन त्यांची आरती करावी असे ज्यांना वाटते त्यांनी खुशाल त्यांची आरती करावी. आम्ही अतिशय साधी भाषा वापरली आहे. आमच्या भाषेविषयी शंका असणाऱ्यांनी स्वतःची मराठी डिक्शनरी पाहावी अन्यथा संतांची पुस्तके वाचावी, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या लोकांना कोणीही मराठी भाषा शिकवू नये असा टोलाही त्यांनी लगावला.
संजय राऊत सध्या नागपूरमध्ये आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल चढवला. महाराष्ट्रद्रोही आणि भ्रष्टाचारी माणसांना जी भाषा समजते त्याच भाषेत बोलावं, असं साधुसंतांनी सांगितलं आहे. ‘हजारो मारावे एक उरावा’ अशा पद्धतीचे राजकारण सध्या भाजपचे नेते करत आहेत. अशा लोकांसाठी शिवसेनेची एक वेगळीच भाषा आहे.
देशाच्या विकासासाठी जर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकत्र येऊन काम करणार असेल तर लोकशाहीत त्याचे स्वागत व्हायला हवं. पण काही लोकांना या देशाच्या लोकशाहीचा अर्थ समजला नाही असंच दिसत असल्याचेही संजय राऊत म्हणाले.