पुणे : प्रतिनिधी
खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी ४ ऑक्टोबरला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपला उमेदवार निश्चित केला आहे. मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा पुण्यात पत्रकार परिषदेत केली आहे. दरम्यान, कॉँग्रेसकडून स्व. राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे समजते.
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा.राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजीव सातव एप्रिल २०२०मध्ये राज्यसभेवर निवडून गेले होते. यांची राज्यसभेची मुदत एप्रिल २०२६ मध्ये संपणार होती. परंतु त्यांचे अकाली निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला जवळपास पाच वर्षांचा कालावधी मिळणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह पाच राज्यात रिक्त झालेल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. २२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. तर चार ऑक्टोबरला या सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून डॉ.प्रज्ञा सातव यांचे नाव चर्चेत असतानाच; भाजपने आपली उमेदवारी संजय उपाध्याय यांना देऊन त्यांचा अर्ज २२ सप्टेंबर रोजी दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे.