मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन निर्धारीत केलेल्या कालावधीत संपणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीने अधिवेशन २२ ते २८ डिसेंबरपर्यंत नियोजीत केले आहे. आजच्या विधिमंडळाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली होती. परंतु भाजपाची ही मागणी फेटाळत राज्य सरकारने अधिवेशन २८ डिसेंबरलाच संपणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
भाजपने हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात यावा अशी मागणी आजच्या सल्लागार समितीच्या बैठकीत केली होती. राज्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करणे बाकी आहे. राज्य सरकारकडून अनेक विषयावर उत्तरे मिळणे अपेक्षित आहे. या विषयावर चर्चा घडवून आणण्यासाठी आधिवेशनाचा कालावधी वाढवावा असा मुद्दा भाजपाकडून उपस्थित करण्यात आला. परंतु राज्य सरकारने भाजपाचा हा मुद्दा फेटाळून अधिवेशन २८ डिसेंबरलाच संपणार असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक शेवटच्या दिवशी म्हणजेच २८ डिसेंबरला होणार असल्याचे कामकाज सल्लागार समितीने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार अध्यक्ष पदाची निवडणूक आवाजी पद्धतीने होणार असून २७ डिसेंबर रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. महाविकास आघाडीकडे अध्यक्षपदासाठी पूर्ण संख्याबळ असले तरी भाजपाकडून उमेदवार रिंगणात उतरवला जाईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.