
सोलापूर : प्रतिनिधी
तब्बल ११ वेळा सांगोला मतदारसंघाचे आमदार राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यांच्यावर सोलापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू असून ते सध्या व्हेंटीलेटरवर असल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गणपतराव देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहेत. पित्ताशयात खडे असल्यामुळे त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सोलापूरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
११ वेळा विक्रमी मताधिक्याने आमदार
अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल ५४ वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. वयाची ९६ वर्षे पूर्ण केलेले गणपतराव देशमुख हे आजतागायत मतदार संघात जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करतात. त्यामुळेच या मतदारसंघातून जनतेने सलग ११ वेळा त्यांना निवडून दिले.