पुणे : प्रतिनिधी
टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्रीपदावरून पायउतार झालेल्या संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा मिळाला असून आत्महत्त्येच्या पाच दिवस आधी संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्यात संभाषण झाले होते. त्याचे रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना महत्वाचा पुरावा सापडला आहे. त्यामुळे माजी मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पूजा चव्हाण हिने आत्महत्या करण्यापूर्वी पाच दिवस आधी संजय राठोड यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामध्ये या दोघांमध्ये तब्बल ९० मिनिटे संभाषण झाल्याची माहिती पुढे येत आहे.
विशेष म्हणजे, या संभाषणाची क्लिपही पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता संजय राठोड यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पूजा चव्हाण हिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणात शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचे नाव आले होते. त्यामुळे राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, संजय राठोड यांना मंत्रीपदावर पुन्हा घेण्याच्या चर्चा सुरू झाल्या असतानाच पुणे पोलिसांना पूजा चव्हाण प्रकरणात महत्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. त्यामुळे आता संजय राठोड यांचे मंत्रीमंडळात पुनरागमन होणार की या प्रकरणाचा ससेमिरा त्यांच्या मागे लागणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.