बारामती : प्रतिनिधी
संत श्री बाळूमामा यांचा अवतार असल्याचे सांगत अनेकांची फसवणूक करणारा भोंदू मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याला साताऱ्यात पकडण्यात आले आहे. बारामती तालुका पोलिस आणि पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने ही कारवाई केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.
बारामतीतील शशिकांत खरात यांच्या फिर्यादीवरून मनोहर भोसले, विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात फसवणूकीसह अन्य गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोहरमामाला ताब्यात घेतले आहे.
साताऱ्यात ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडीलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडीलांच्या व फिर्यादीच्या जिविताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यावरून बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.