
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेकडून राष्ट्रवादीसोबत युतीचा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु काही कारणास्तव तसे झाले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची राष्ट्रवादीसोबत जाण्याची इच्छा होती, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर भाजपसोबत युती तोडण्याचा विचार केला होता. दहा वर्षांपूर्वी शिवसेनेने ती मानसिकता तयार केली होती. काँग्रेससोबत असताना राष्ट्रवादीला आघाडीचा प्रस्ताव शिवसेनेकडून देण्यात आला होता. परंतु काही कारणास्तव आघाडी शक्य झाली नाही. आघाडीचा निर्णय २०१९ मध्ये घेण्यात आला. भाजपमुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले आहे, हे पाच वर्षांचा निकाल पाहिला तर लक्षात येते, असे मलिक यांनी म्हटले आहे.
शिवसेना काय आहे हे समजल्याने भाजप अशा प्रकारचे वक्तव्य करत आहे. शिवसेनेला संपविण्याचे राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मदतीने केले. भाजपमुळे शिवसेना कमकुवत झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथे २५ वर्षे युतीत सडलो, खळबळजनक वक्तव्य केले होते. शिवसेनेची ताकद आता वाढत आहे. भाजपसोबत कमकुवत झालेल्या शिवसेनेचा आता आलेख कितीतरी पटीने वाढत आहे, हे नगरपालिकांच्या निकालावरून दिसून आले आहे, असेही ते म्हणाले.