मुंबई : प्रतिनिधी
महिला अत्याचाराच्या घटनेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला भाजपने लक्ष्य केले आहे. अशातच काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच महाराष्ट्रातील महिला अत्याचारांचे प्रमाण सर्वाधिक होते असे म्हटले आहे .त्याचसोबत त्यांनी भाजपची सत्ता असलेल्या सर्वच राज्यात महिला अत्याचाराची आकडेवारी जास्त असल्याचे सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महिला अत्याचारांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर होता. उलट महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महिला अत्याचारांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे; त्या सर्व राज्यात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महिला अत्याचारावर चर्चेसाठी संसदेचे अधिवेशन घेण्याच्या मागणीचे आम्ही स्वागत करत असे सचिन सांवत यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी फडणवीस सत्तेत असताना महिलांवरील अत्याचारांचे आकडेवारीचे विवेचन केले. २०१९ मध्ये सामूहिक बलात्काराचे व हत्येच्या ४७ घटना घडल्या होत्या. त्यावेळी याबाबत आपल्या राज्याचा देशात पहिला क्रमांक होता. आजही ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे. त्या सर्व राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे चार दिवसीय संसदेच्या अधिवेशनाची मुख्यमंत्र्याची मागणी योग्य आहे. राज्यातील भाजपच्या लोकांनी या मागणीचे समर्थन करायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे.