
कोल्हापूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेले खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी महाविकास आघाडी सरकारचे जाहीर कौतुक केले आहे. कोल्हापुरातील मुक आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठका झाल्या. त्यामध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेतले. केवळ निर्णय घेऊन न थांबता महाविकास आघाडी सरकारने त्याची अंमलबजावणीही केली अशा शब्दांत कौतुक करत छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारचे आभारही मानले.
कोल्हापूरमध्ये आज छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सारथी संस्थेच्या उपकेंद्राचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मूश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शाहू महाराज आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना छत्रपती संभाजीराजे यांनी महाविकास आघाडी सरकारचे जाहीरपणे कौतुक करत आभारही मानले.
यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, मराठा समाज सक्षम होण्यासाठी सारथी संस्था सक्षम होणे आवश्यक आहे. या संस्थेला स्वायत्तता मिळावी ही आमची मागणी आहे. एका अधिकाऱ्याच्या चुकीच्या धोरणामुळे ही स्वायत्तता गेली होती. त्यामुळे आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मराठा समाजासोबत असल्याचे सांगितले.
तर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली. त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अनेक प्रश्न निकाली लागले. सारथी संस्थेच्या उपकेंद्रासाठी कोल्हापूरमध्ये इमारतीसह सव्वादोन एकर जागा मिळाली आणि इमारत हस्तांतरही करण्यात आली. या संस्थेला संशोधन केंद्र करायचं असेल तर किमान पाच एकर जागेची आवश्यकता आहे. या सरकारकडून सुरुवात तर चांगलीच झाली आहे. त्यामुळे पुढेही चांगलेच काम होईल असेही छत्रपती संभाजीराजे यांनी नमूद केले.