Site icon Aapli Baramati News

प्रश्न विचारण्यासाठी अक्कल लागत नाही : उद्धव ठाकरेंची टीका

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिका नागरिकांना सर्वाधिक सुविधा देत आहे. मात्र महापालिकेत कुठे थोडे खुट्ट झाले की लगेच महापालिकेला दोष दिला जातो. प्रश्नांचा भडीमार केला जातो. महापालिका काय करत आहे असे प्रश्न निर्माण केले जातात. प्रश्न विचारणे सोपे असते. त्यासाठी अक्कल लागत नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दृश्यप्रणालीद्वारे  मुंबई महानगरपालिकेतील ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, कोरोना संकटामध्ये मुंबई महानगरपालिकेने प्रचंड काम केले आहे. महापालिकेचे घरच्यांनी कुणी कौतुक केले नाही. तर थेट न्यूयॉर्कने आणि सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केले आहे. कौतुकासाठी आपण काम करत नाही तर कर्तव्य म्हणून आपण काम करत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

आज होणाऱ्या कार्यक्रमाची उद्या किती मोठी बातमी होईल, हे माहिती नाही. परंतु उद्या दोष देणारे अनेक आहेत.महानगरपालिकेकडून जरा कुठे काहीतरी खुट्टं झाले तर प्रश्न विचारले जातात.  नगरसेवक काय करतात..?  पालिका आयुक्त काय करतात..?  हे काय करतात..? ते काय करतात..? हे सगळं ठीक आहे. परंतु तू काय करतो  ते स्वतः अगोदर सांग. स्वतः काहीच करायचे नाही, पण प्रश्न विचारायचे. प्रश्न विचारायला सोपे असते. त्यासाठी अक्कल लागत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version