भिवंडी : प्रतिनिधी
भिवंडीतील दुर्गाडी पुलावरून उडी मारत एका प्रेमी युगुलाने आपला जीव संपवल्याची घटना घडली आहे. बचाव पथकाला तरुणाचा मृतदेह मिळाला असून तरुणीचा मृतदेह अद्यापपर्यंत मिळालेला नाही. या दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
प्रशांत गोडे (वय २२, रा. कोळसेवाडी, कल्याण) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासोबतच्या तरुणीचे नाव समजू शकलेले नाही. याबाबत मिळालेली माहिती अशी की, हे दोघेही एका दुचाकीवरून दुर्गाडी पुलावर आले. पूलावरून या दोघांनीही खाडीत उडी मारत आपला जीव दिला.
हा प्रकार पाहणाऱ्या नागरिकांनी कानगाव पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अग्निशामक दलासह घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. यातील तरुणाचा मृतदेह सापडला असून तरुणीचा मृतदेह अद्यापपर्यंत मिळालेला नाही. शनिवारी उशीरापर्यंत ही शोध कार्य सुरू होते, मात्र अंधार पडल्यामुळे त्यात अडथळा आला.
दरम्यान, या घटनेतील तरुणी कोण याचा शोध पोलिस घेत आहेत. या दोघांनी आत्महत्या का केली याचेही कारण समोर आलेले नाही. या प्रकरणी कानगाव पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे.