कुरकुंभ : प्रतिनिधी
पुणे-सोलापूर महामार्गावर डोळ्याला थरकाप आणणारी घटना सोमवारी घडली आहे. महामार्गावर धावत्या स्कूल बसने अचानक पेट घेतला. बसच्या चारही बाजूने पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत स्कूल बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
ही घटना मळद-रावणगावच्या हद्दीत घडली. सोलापूरहून पुण्याकडे निघालेल्या बसने रावणगाव हद्दीत अचानक पेट घेतला. स्कूल बसला पेट लागल्याचे समजताच चालक खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला. या बसमध्ये दोन प्रवाशी होते, असे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी सांगितले. महामार्गावर आगीचे लोट हवेत पसरले होते.
पोलीस आणि कुरकुंभ एमआयडीसीमधील अग्निशमन दलाने धाव घेत मदतकार्य केले. चारही बाजूने पेट घेतल्याने ही बस जळून खाक झाली आहे. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु या घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.