
पुणे : प्रतिनिधी
आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार नसल्याची स्पष्ट भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. जर युती करायची असेल तर मी निर्णय घेईल असे सांगतानाच राज ठाकरे यांनी पक्षसंघटना बळकट करा, संघटनेच्या जीवावर तुम्ही निवडून येणार आहात. भाजपच्या नव्हे! असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे.
बुधवारी राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील विधानसभानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका पडल्या.यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटन बळकट करण्यासाठी सूचना दिल्या. राज ठाकरे आणि पक्ष म्हणून मी मतदारांपर्यंत पोहचलो आहे. आता तुम्ही मतदारांच्या घरोघरी जा. जनसंपर्क अधिक वाढवा. प्रसारमाध्यमांचा वापर कमी करा. पक्षातील एकमेकांचे मतभेद विसरून पक्ष वाढीसाठी काम करा. त्यामुळे तुमचा विजय होईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
मी मुंबईतून तुमच्यासाठी इथे आलो आहे. मात्र तुम्ही एकमेकांना पाडण्यात गर्क असला, तर त्याचा काय उपयोग आहे असा प्रश्न उपस्थित करत पक्षबांधणीवर लक्ष द्या, पक्ष संघटन बळकट करा, भाजपसोबतच्या युती करण्याची चर्चा बंद करा. त्यांच्याकडून तसा काही निरोप आल्यास मी निर्णय घेईल. तुम्हाला सांगेल. परंतु येत्या महिनाभरात न ऐकल्यास मी तुम्हाला बदलेन, अशी ताकीदही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे.