
पुणे : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १४ जागा बिनविरोध करण्यात यश आले आहे. उर्वरीत सात जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. यापूर्वीच राष्ट्रवादीच्या तब्बल सात जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर आज सात जागा बिनविरोध करण्यात राष्ट्रवादीला यश आले. उर्वरीत सात जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
बारामती ‘अ’ वर्ग प्रवर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार, आंबेगाव ‘अ’ वर्ग प्रवर्गातून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दौंड अ वर्गातून विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात, पुरंदर अ वर्गातून आमदार संजय जगताप, भोर अ वर्गातून आमदार संग्राम थोपटे, जुन्नर अ वर्गातून संजय काळे, इंदापूर अ वर्गातून आप्पासाहेब जगदाळे, खेड अ वर्गातून आमदार दिलीप मोहिते, मावळ अ वर्गातून माऊली दाभाडे, वेल्हा अ वर्गातून रेवणनाथ दारवटकर, ‘ब’ वर्गातून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून प्रवीण शिंदे (हवेली), इतर मागासवर्गीय प्रवर्गातून संभाजी होळकर (बारामती) आणि भटक्या जाती जमाती प्रवर्गातून दत्तात्रय येळे (बारामती) यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.
पुणे जिल्हा बँकेच्या हवेली अ वर्गातून विद्यमान संचालक प्रकाश म्हस्के व विकास दांगट हे रिंगणात आहेत. तर शिरुर अ वर्गामधून आमदार अशोक पवार व आबासाहेब गव्हाणे हे उमेदवार रिंगणात आहेत. मुळशीतून आत्माराम कलाटे व सुनिल चांदेरे हे रिंगणात आहेत. ‘क’ वर्गातून सुरेश घुले , प्रदिप कंद व दिलीप मुरकुटे हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ‘ड’ वर्गात दादासाहेब फराटे व दिगंबर दुर्गाडे यांच्यात लढत होत आहे. महिला राखीव प्रवर्गातून आशा बुचके, निर्मला जागडे व पुजा बुट्टे पाटील हे उमेदवार आहे.