
पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि आप्पासाहेब जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तीन वाजेपर्यंत मुदत असून त्याचवेळी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
इंदापूर तालुक्यातून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि भाजपचे आप्पासाहेब जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आप्पासाहेब जगदाळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रणजीत निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज होता. त्यांनी माघार घेतल्यामुळे जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली. त्याचवेळी दत्तात्रय भरणे यांच्या विरोधातील अर्जही माघारी घेण्यात आल्याने त्यांचीही सलग सहाव्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.
पुणे जिल्हा बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. या निवडणुकीत अजित पवार यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे, रेवणनाथ दारवटकर, ज्ञानोबा दाभाडे आणि प्रवीण शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून त्यामध्ये किती अर्ज राहतात की निवडणूक बिनविरोध होते याकडेच लक्ष लागले आहे.