पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
आमचे आमदार, नगरसेवक पिंपरी-चिंचवडमध्ये नीट कसे वागतील, आमच्या ताब्यात कसे राहतील हे पाहण्यास आम्ही समर्थ आहोत. आमची या परिसरात ताकद मोठी आहे. त्यामुळेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष घालण्याची वेळ आली आहे, असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील रावेत भागात पाटील एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी बोलताना चंद्रकात पाटील म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले. अजित पवार तर तिथेच असतात. यावरून लक्षात येते की, पिंपरी-चिंचवड मध्ये भाजपाचे सामर्थ्य मोठे आहे. त्या ठिकाणी भाजपाला हरवणे अवघड आहे. त्यामुळेच एवढे सगळे नेते इकडे लक्ष घालत आहेत.
जरंडेश्वर कारखाना हा विषय तपास यंत्रणेचा आहे. तपास यंत्रणा त्या कारखान्याची चौकशी करत आहे. जर अशा ६४ कारखान्यांची चौकशी करायची असेल तर करावी. फक्त एकाची चौकशी करा व इतरांची कोणाचीच नको आम्ही असे म्हटले आहे का ? आम्ही कोणाला चौकशी करण्यापासून अडविले नाही. बाकीचे सगळे कारखाने कमीत कमी किमतीत कसे काय विकले गेले आहेत ? याबाबत राज्य सहकारी बॅंकेने चौकशी करायला हवी अशीच आमची मागणी असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी आयर्न खान ड्रग्स प्रकरणावरून राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधला. काहीजण उच्च न्यायालयात वगैरे जाणार असल्याचे सांगत आहेत. या सगळ्यांना शाहरुख खानच्या मुलाचा पुळका का आला आहे ? वास्तविक पाहता राज्यांमध्ये महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत. याबाबत राज्य सरकार तातडीने कोणतीही कारवाई करत नाही. मात्र आर्यन खानला जामीन मिळत नाही. त्यामुळे एवढी तडफड करण्याची काय गरज आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.