
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘चलेजाव भाजप’ असे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते महानगरपालिकेच्या आवारात एकवटले होते. निवडणुकीत भ्रष्ट भाजपाच्या कारभाराला उलथवून टाकू’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारणीत बदल केल्यानंतरचा हा पहिलाच मोर्चा आहे.
चिंचवडच्या पोलीस ठाण्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. नंतर या मोर्चात असंख्य कार्यकर्ते जोडत गेले. पुढे महानगरपालिकेच्या आवारात हजारो कार्यकर्ते जमले. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून सत्ताधारी भाजपा विरोधात घोषणा देण्यात आल्या. निवडणुकीत भ्रष्ट भाजपाच्या कारभाराला उलटून टाकू, भ्रष्ट सत्ताधारी चलेजाव आदी घोषणा, यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.
यावेळी बोलताना माजी आमदार विलास लांडे म्हणाले , महापालिकेतील भ्रष्ट सत्ता घालवण्यात येईल. हा मोर्चा महापालिकेतील भ्रष्ट कारभाराविरोधात हल्लाबोल आहे. सत्ताधारी भाजपाकडून घोटाळे करण्यात आले आहेत. चुकीचा खर्च दाखवून निवडणुकीसाठी फंड गोळा केला.
इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पात घोटाळा केला. स्मार्ट सिटी करण्याच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरले गेले. कचऱ्याच्या प्रकल्पांमध्ये स्वतःच्या घरातील बगलबच्च्यांना ठेका देऊन पैसे लुटले गेले आहेत. अशा अनेक भ्रष्टाचाराची यांची प्रकरणे आहेत, असा आरोप विलास लांडे यांनी यावेळी केला.
yNEuDePIALiz