पुणे : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले आहेत. सलग दुसऱ्या दिवशीही हे चौकशी सत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. पाहुणे वेगवेगळ्या घरात आहेत. ते त्यांचं काम करत आहेत. त्यांचं काम झाल्यानंतर माझी भूमिका मी स्पष्ट करेल, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी आयकर विभागाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर भुमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशीही धाडीचे सत्र चालू ठेवले आहे. आयकर विभागाच्या सलग दुसऱ्या दिवशी सुरु असलेल्या कारवाईसंदर्भात अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पाहुणे वेगवेगळ्या घरांमध्ये आहेत. ते त्यांचं काम करत आहेत. घाबरण्याचे काही कारण नाही. जे सत्य आहे ते उघड होईल. दूध का दूध, पाणी का पाणी समोर येईलच. त्यामुळे पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी संबंधित संस्थांसह त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या घर, कार्यालयांवरही छापे टाकले आहेत. राजकीय आकसातून ही कारवाई होत असल्याच्या प्रतिक्रिया महाविकास आघाडीतील नेत्यांनी दिल्या आहेत.